Wednesday, October 22, 2014

उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली

उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली



एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु
झालेली असायची. दसर्यापासूनच
थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची.
दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने उकलायचे.
किल्ला गारूच्या मातीने भगवा करून टाकायचा. त्यावरचे
हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर
पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून
बुरुंजाला भेगा पडायच्या. दिवस जायचा 'गड'
राखण्यात !!
फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग
मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात
सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे
रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.
फटक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी,
लक्ष्मी, सुतळी, कनकावळे, भुईनुळे, चक्र, फुलझडी,
नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची.
एकदम 'श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. घरी येवून
छोट्या भावाबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात
गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान
चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच
काय ती दारू माहिती तेव्हाची !!
'पोरानो, लवकर झोपा. सकाळी अभंगस्नानाला उठायचं
आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप
कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश,
दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं.
न्हाणीघरात पितळी बंब पेटायचा. त्याच्या जवळ बसून
अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं.
तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला कि छान
वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा.
मला तो आवडायचा. 'मोती' साबण छोट्याश्या हातात
मावायचा नाही आणि बादलीतल पाणी संपूच नाही असं
वाटायचं.
देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे
अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते
गोठायचं नाही म्हणून बर वाटायचं.
मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो.
फक्त एक लवंगी सर वाजवायचा बाकी सगळे सोडून.
पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते. दिवस हळूहळू
उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढाजास्त
आनंद व्हायचा त्याचा.
आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगलो असं
शेवटचं? लहान होवून. छोट्या गोष्टीत रमून. निरागसपणे.
अशी सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीये
का आपण खूप पुढे आलोय?
ह्या दिवाळीत मी पुन्हा असं सगळं जगणार आहे. वय
नाही पण मन लहान करून पुन्हा मागे जाणार आहे.
बंबाचा धूर डोळ्यात घालवणार आहे. मोती साबण
आणि उटन अंगभर चोळून घेणार आहे. टक्कल
पडलेल्या डोक्याला जास्मिनच तेल लावणार आहे.
देवघरातल्या मंद प्रकाशात हि प्रार्थना करणार आहे
कि 'हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.' !!
उठा उठा दिवाळी आली, परत एकदा लहान व्हायची वेळ झाली !!

लेखक : अनोळखी

No comments:

Post a Comment