Wednesday, July 8, 2015

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो
तिच्या एका “झलके” साठी बोळ बोळ फिरायचो,
ती दिसायची नाही पण तिचा बाप बाहेर यायचा,
त्याला कळू नये म्हणून मग “झाल का जेवण” विचारायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटच्या बाकड्यावर बसून तीला बघत असायचो,
ती कधी तरी पहायची मग विचारात गुंतत रहायचो,
हिला आता विचारूच म्हणत तिच्या मागे फिरायचो,
चिंचा, आवळे, बोरं तिला कुरणात जावून आणायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

यात्रे दिवशी तेवढ देवाला निवद घेवून जायचो,
नदीवरच्या पुलावर तिची वाट पहात असायचो,
ती यावी म्हणू आधीच देवाला नवस बोललेलो असायचो,
ती आल्यावर मात्र नारळ फोडून देवाचा नवस मग फेडायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

धुणं धूया ती जेव्हा नदीकाठी यायची,
कमरेवर बादली आणि मैत्रीण सोबत असायची,
आम्ही मात्र चड्डीवर पाण्यात उड्या मारायचो,
मग खेकड्यावानी कपारीला लपून तिला पाहायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या मैत्रिणीच्या लग्नात आवर्जून जायचो,
नवरा भावबंद असल्यासारख घोड्यासमोर नाचायचो,
तिनं बघाव म्हणून जोरात उड्या मारायचो,
ती हसलेली बघून आनंदात न जेवताच घरी यायचो
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

मग कधी तिला मुलगा पाहायला यायचा,
आम्ही तेव्हा मात्र पांदीला गुरामाग असायचो,
बघून देखून गेल्यावर आम्हाला बातमी ती कळायची,
मग आपल रात्री नुकताच विचार करत झोपायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

शेवटी तिच्या लग्नाची पत्रिका घरी यायची,
आम्ही ती तेव्हा मात्र निरखून वाचायचो,
कार्यवाहकाच्या यादीत तेव्हा आम्ही असायचो,
तीच लग्न तेव्हा जबाबदारीन पार पाडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

तिच्या लग्नात लाडू खाल्यावर आम्ही घरी परत यायचो,
रानामधी जावून सरीच्या अंकुराशी बोलायचो,
दोन तीन दिवस न जेवताच गावात फिरत रहायचो,
मनामधी तेव्हा खरच फार रडायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो

ती सोळाव्याला आली की तिला जावून भेटायचो,
कस आहे सासर सारी विचारपूस करायचो,
नकळत तेव्हा तिच्या डोळ्यात येणारे हळुवार पाणी पाहायचो,
आणि मग तेव्हा तिच्या मनातल प्रेम आम्ही समजायचो,
गावाकड प्रेम बघा आम्ही असच करायचो


कवी : Mr. Sagar Kakade. ९९६०४५५५२२
कविता WhatsApp वर वाचनात आली. आवडली म्हणून शेअर केली. कवीचे नाव कळल्यास श्रेय देण्यात येईल.

No comments:

Post a Comment